मनोरंजक खेळ

👧विद्यार्थ्यांसाठी मनोरंजक खेळ👦





⚽01 .) स्मरण खेळ –
विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आपण स्मरण खेळ घेऊ शकतो. हा खेळ घेताना टेबलावर २० – २५ लहान लहान वस्तू ठेवाव्यात.
उदा. मोबाईल , पेन , पेन्सील ई. आणि त्या वस्तू मुलांना दाखवाव्यात. मुलांना त्या वस्तू लक्षात ठेवायला सांगाव्यात. नंतर त्या वस्तू
कापडाने झाकून ठेवाव्यात.
नंतर मुलांना लांब लांब बसून त्या वस्तू लिहायला सांगाव्या. त्या वस्तू आठवताना मुलांना फार विचार करावा लागेल.
जेणेकरून मुलांची स्मरण शक्ती वाढण्यास मदत होईल.
——————————————
⚽02 ) ओंजळीने ग्लास भरणे –
मुलांना या खेळात फार आनंद मिळतो. प्रथम आपण १० – १२ मुलांचे गट करावेत. नंतर समान आकाराचे गटातील संख्ये नुसार ग्लास
घ्यावे आणि सरळ रेषेत समान अंतरावर ठेवावे. त्यानंतर ठराविक अंतरावर पाण्याच्या भरलेल्या बादल्या ठेवाव्या. मुलांना त्या बादलीतील
पाणी ओंजळीने घेऊन जावे लागेल आणि आपल्या ठरलेल्या ग्लास मध्ये टाकावे लागेल. ओंजळीने पाणी नेउन त्यांना आपला ग्लास
भरावा लागेल.
या खेळात ज्या मुलाचा ग्लास लवकर भरेल तो मुलगा पहिला येईल. यामुळे मुलांचा शारीरिक विकास होण्यास पण
मदत होईल.
——————————————
⚽03. ) ठराविक वेळेत गणिते सोडवणे –
मुलांना आपण २०-२५ बेरीज , वजाबाकी किवा इतर कोणत्याही प्रकारची २०-२५ लहान लहान कोणत्याही प्रकारची गणिते देऊ शकतो
आणि ४-५ मिनिटांचा वेळ देऊन ती गणिते आपण विद्यार्थ्यांना सोडवायला लाऊ शकतो. त्या वेळेत गणिते उत्तरासह सोडवणे अपेक्षित आहे.
सुरुवातीला १ अंकी गणिते द्यावीत नंतर चांगला सराव झाल्यास अंक वाढवत जावे. अश्याप्रकारे खेळातून गणिताचा सराव घ्यावा.
या खेळत १००% मुलांना सहभागी करावे.
——————————————
⚽04. ) एकमेकांना हसवणे –
मुले जर कांटाळलेले असतील तर अश्या वेळेस हा खेळ घ्यावा. काही मुलांना सर्वांच्या समोर उभे करावे आणि बसलेल्या मुलांपैकी एकाने
येउन त्यांना हसवण्याचा प्रयत्न करावा. मात्र त्यांना हसवताना हात लावायचा नाही. वेगवेगळे हावभाव , वेगवेगळे आवाज काढून , विनोद
सांगून त्यांना हसवावे. जे मुले हसतील त्यांना खाली बसवावे आणि जे मुले हसणारच नाहीत त्यांना या खेळाचा विजेता घोषित करावे.
—————————————
⚽05. ) आवाज ओळखणे –
एका मुलाचे डोळे रुमालाने बांधावे . बाकी वर्गातल्या / गटातल्या मुलांनी थोड्या अंतरावर उभे राहावे आणि त्या मुलाला नाव घेऊन बोलवावे.
त्या आवाजावरून डोळे बांधलेल्या मुलाने कोणी आवाज दिला ते सांगावे . जर त्याने बरोबर ओळखले तर त्याला एक गुण द्यावा .
असे सर्व मुले होई पर्यंत खेळ सुरु ठेवावा . ज्याला जास्त गुण मिळतील तो विजयी घोषित करावा.
——————————————
⚽06.) खोक्यातील वस्तू ओळखणे –
एक मोठे खोके घ्यावे . त्यात लहान लहान बॉल , पेन , पेन्सिल अश्या १०-१२ वस्तू भराव्या . त्यानंतर त्या खोक्याचे तोंड बंद करावे . त्या खोक्याला एका बाजूने मुलांचे हात आत जातील एव्हडे मोठे छिद्र पाडावे. नंतर एका – एका मुलाने त्या खोक्यात हात घालून हाताने चाचपडून वस्तू ओळखाव्या .
——————————————
⚽07.) वासावरून वस्तू ओळखणे –
बाजारात प्लास्टिक चे ग्लास मिळतात ते आपण आणावे . पण ते ग्लास पारदर्शक नसावेत.नंतर एका – एका ग्लासात कांदा , लसुन अश्याप्रकारे वेगवेगळ्या वस्तू भराव्यात आणि ग्लासला एक एक कागद चिटकवावा. त्या वर चिटकवलेल्या कागदाला सुईने लहान – लहान छिद्र पाडावे आणि मुलांना त्या छीद्रातून वास घेऊन वस्तू ओळखण्यास सांगावे.
—————————————
⚽08.) फुगे फोडणे –
लहान मुलांसाठी आपण हा खेळ घेऊ शकतो . या खेळात आपण काही फुगे फुगवून जमिनीवर सोडावे फुगे फुगवताना त्यात थोडी कमी हवा भरावी . एका – एका मुलाने येउन फुगे फोडण्याचा प्रयत्न करावा. पण न हात पाय लावता आणि ३० सेकंदात फुगे फोडावे. असा नियम ठेवावा. दिलेल्या वेळेत जो मुलगा जास्त फुगे फोडेल तो विजेता घोषित करावा.
——————————————
⚽09.) बॉल फेकून मारणे –
या खेळात विद्यार्थ्यांचे दोन गट करावे. एक वर्तुळ आखून वर्तुळात एक गट उभा करावा आणि दुसऱ्या गटातील मुलांना ठराविक अंतर घेऊन उभे करावे. त्यांच्या हातात ३ प्लास्टिक चे बॉल द्यावेत. प्रत्येकाला ३-३ बॉल मारता येतील. तो बॉल त्यांनी वर्तुळातील मुलांना फेकून मारावे आणि वर्तुळातील मुलांनी त्या येणाऱ्या बॉल पासून आपला बचाव करावा. जेवढे बॉल वर्तुळातील मुलांना लागतील तेवढे गुण बॉल फेकणाऱ्या मुलांना द्यावेत. सर्व मुले संपल्यावर गट बदलावा.
——————————————
10)     नेमबाजी –
ठराविक अंतरावर एखादी वस्तू ठेऊन मुलांनी त्या वस्तूला बॉल ने नेम मारावा . प्रत्येकाला ३-३ संधी द्याव्यात जेवढ्या वेळा मुलाचा नेम लागेल तेवढे गुण त्या मुलाला द्यावेत. जास्त गुण घेणारा मुलगा विजेता घोषित करावा.
——————————————
⚽11.) विद्यार्थी ओळखणे –
एका ओळीत ठराविक १०-१५ विद्यार्थी उभे करावे आणि एका मुलाला ते विद्यार्थी अनुक्रमे कसे उभे राहिले आहेत ते पाहायला लावावे . आणि तोंड फिरून नंतर त्याने त्याच क्रमाने उभे असलेल्या मुलांची नावे सांगावी. नावाचा क्रम चुकल्यास तिथून पुढचे सगळे चुकीचे ठरवावे. अश्याप्रकारे जो मुलगा जास्त विद्यार्थी क्रमाने सांगेल तो विजेता ठरवावा.
——————————————
⚽12.) बादलीत चेंडू टाकणे –
एक मोठी बदली घेऊन ठराविक अंतरावर ठेवावी आणि फुटबॉल / vollyball घेऊन त्या बादलीत टाकण्यास सांगावे. प्रत्येक मुलाला तीन संधी द्याव्यात . मुलाने किती वेळा बॉल बादलीत टाकला आणि बॉल बादलीत थांबला यावर क्रमांक ठरवावा.
——————————————
⚽13.) संदेश पोचवणे –
या खेळात १०-१५ मुलांना एका ओळीत बसवावे आणि आपण समोर बसलेल्या मुलाला जवळ बोलवून त्याला एखादे व्याक्य सांगावे. त्या मुलाने जाग्यावर जावून त्याच्या मागे बसलेल्या मुलाच्या कानात ते वाक्य सांगावे. अश्याप्रकारे मुलांनी आपापल्या मागील मुलाला ते वाक्य सांगावे आणि सगळ्यात शेवटी बसलेल्या मुलाने ते वाक्य सगळ्यात पुढे येवून सांगावे. आपण पहिल्या मुलाला सांगितलेले वाक्य आणि शेवटच्या मुलाचे वाक्य फार वेगळे येते.
⚽14.) आंधळी कोशिंबीर –
हा खेळ खेळताना एका मुलाचे डोळे रुमालाने बांधावे.बाकीच्या मुलांनी एक वर्तुळ करून आत थांबावे. डोळे बांधलेल्या मुलाने वर्तुळातील एखाद्या मुलाला पकडावे आणि कोणाला पकडले ते ओळखावे . वर्तुळातील मुलांनी डोळे बांधलेला मुलगा वर्तुळाच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी. त्याला वेळोवेळी सूचना द्याव्यात. पट्टी बांधलेला मुलगा ज्या मुलाला पकडेल व ओळखेल त्या मुलाच्या डोळ्यावर नंतर पट्टी बांधावी आणि खेळ पुढे सुरु ठेवावा.
——————————————
⚽15.) विष – अमृत –
एक मोठे वर्तुळ आखावे . त्यात सर्व मुले पळतील. त्यांना एक मुलगा शिवायला जाईल. तो ज्या मुलाला शिवल त्या मुलाला विष मिळाले असेल त्यामुळे त्याने खाली बसावे. दुसऱ्या मुलांनी त्या बसलेल्या मुलाला शिउन अमृत द्यावे. अमृत मिळाल्यास तो बसलेला मुलगा उठून पळू शकतो. विष देणाऱ्या मुलाने त्यांना अमृत देण्यापासून थांबवावे.

No comments:

Post a Comment